मनसेची “राज”नीती

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपली भुमिका जाहीर केली आणी एका नव्या वादाला तोंड फोडले. एका  बाजुला  मोदिंना  पाठींबा  जाहिर  करुन  दुसरीकडे  शिवसेनेच्या  उमेदवारांना  धडा  शिकवण्याची भाषा करुन शिवसेनेच्या आणि भाजपच्या अडचणीत भर टाकली. न मागता दिल्या गेलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपसमोर काही नाजूक प्रश्न निर्माण होतात..

राजकारणाच्या खेळात एखाद्याची अडचण त्याला हवे ते नाकारून जशी करता येते तशीच नको असेल ते देऊनही करता येते ते राज ठाकरे यांनी दाखवून दिले.  भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आघाडीतील एकालाच राज यांनी पाठिंबा जाहीर केल्याने दुसऱ्याच्या मनात संदेह निर्माण झाला असून त्या पक्षाच्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे चिडचिड सुरू केली. अगदी भारतीय जनता पक्षाशी  असलेली  युती  तोडावी  या टोकाच्या भुमीकेपर्यंत संबंध ताणले गेले. आता भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी  उद्धव ठाकरेंची भेट घेवुन परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सगळे काही आलबेल आहे असे नाही.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकेक खासदार जोडावा अशी गरज असताना आहे, त्यांतून कोणाला कमी करणे त्यांना परवडणारे नाही ही भाजपची अडचण राज ठाकरे यांनी ओळखली आणि म्हणूनच भाजपला जाहीर पाठिंबा देऊन शिवसेनेच्या आणि भाजपच्या अडचणीत भर टाकली. न मागता दिल्या गेलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपसमोर काही नाजूक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ ज्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे तेथे उभ्या असलेल्या मनसे उमेदवाराशी भाजप कसा वागणार? या मनसे उमेदवारावर भाजपने समजा जोरदार टीकास्त्र सोडले तर तुम्हांस पाठिंबा देणाऱ्यावरच का टीका करता, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचे उत्तर भाजप कसे देणार? की सेनेच्या मतदारसंघात भाजप नेते प्रचारालाच जाणार नाहीत? याउलट अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते की मनसे उमेदवाराकडून  रिंगणातील शिवसेना उमेदवारालाच आपले लक्ष्य केले जाऊ शकते. तसे झाल्यास भाजप हा सेनेच्या मदतीस जाणार की मनसेच्या? त्याहूनही अधिक गंभीर प्रश्न असा की भाजपस राज ठाकरे यांनी देऊ केलेला पाठिंबा हवा आहे की नको? पाठिंबा हवा असे भाजप नेत्यांस वाटत असल्यास ते त्यानुसार मागणी करणार काय? आणि नको असल्यास तुमच्या पाठिंब्याची आम्हांस गरज नाही, असे राज ठाकरे यांना खडसावण्याची हिंमत भाजप दाखवणार काय?

अगदी मनसेच्या बाबतीत बोलावयाचे झाले तर हा डाव मनसेच्या अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेना व मनसे हे दोन्ही पक्ष मराठी माणसासाठी काम करणारे पक्ष म्हणुन ओळखले जातात. दोन्ही पक्षांच्या बाबतीत काही तक्रारी असल्या तरी दोन्ही पक्ष वाढावेत, मराठी माणसाचा आवाज बुलंद व्हावा असे प्रत्येक मराठी मनाला वाटते.  आमच्यामुळे कॉग्रेंस आघाडीला मदत होणार नाही  किंवा आमच्यामुळे शिवसेनेची मत फुटणार नाहीत असे जरी मनसे युक्तिवाद करत असली तरी सत्य परिस्थीती काय आहे हे मागिल निवडणुकांत दिसुन आले. जोडीदारची ताकद कमी करुन आपली ताकद वाढवण्याचे भाजपाचे धोरण स्पष्ट आहे.  शिवसेनेविषयी  अजुनही  मराठी  माणसाच्या मनात सहानुभुती  आहे. शिवसेनेची  वाढ  खुंटावी,  शिवसेना  संपावी  असे  कोणाही  मराठी  प्रेमी  व्यक्तिला  सहन  होण्यासारखे  नाही.  अगदी  मनसेच्या निष्ठावान  कार्यकर्त्यांनाही  नाही. केवळ शिवसेना विरोध करुन मत मिळतील असे मनसेला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

जर ह्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे उमेदवार पडले तर याची मोठी किंमत मनसेला विधानसभेच्या निवडणुकांत मोजावी लागु शकते. कॉग्रेंस आघाडीकडुन “तोड पाणी” घेतल्याचा आरोपही होऊ शकतो. राज ठाकरेंसारख्या मुरब्बी राजकारण्याने या सर्व गोष्टींचा विचार केला असणारच!! तुमचे याबद्दल काय मत आहे हे जरुर कळवा