जागे व्हा आणि जागे करा…..

नमस्कार, निवडणुकांचे रणशिंग वाजुन गेले. २२ तारखेला निकाल लागतील व नविन उमेदवार निवडुन येतील. अजुन महिनाभर तरी या निवडणुकांचे कवित्व चालत राहील, परंतु या निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी खरोखरोच चिंताजनक आहे. पालघर आणी बोईसर शहरातील मतदान पाहता हे सहजच लक्षात येइल.

सर्वच राजकीय पक्षांनी, त्यांच्या तालेवार नेत्यांनी आणि प्रसिद्धिमाध्यमांनी “मतदान करण्या’चे आवाहन वारंवार करूनही मतदानाची टक्केवारी फारशी पुढे सरकू शकली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीशी तुलना करता, या वेळी मतदानाचा आकडा थोडा वर गेला; पण तो तेवढा समाधानकारक नाही. हे का होत असेल? मतदारांना आपल्या लोकशाहीची, त्यात आपल्याला मिळालेल्या मतदानासारख्या महत्त्वाच्या अधिकाराची जाणीव का असू नये? एवढे नागरिक मतदानापासून दूर राहतात, याला जबाबदार कोण? या प्रश्‍नाचे सरळ सरळ उत्तर “ते नागरिक स्वतः’ हे तर आहेच; पण त्यात अर्धसत्याचा अंश आहे. हे उत्तर परिपूर्ण नाही.

मतदानाविषयीची उदासीनता किंवा नकारात्मकता ज्या कारणांसाठी आहे, असे सांगितले जाते, ती समर्थनीय तर नाहीतच; उलट त्यावर उपाय शोधण्याचा मार्ग मतदानाचा आपला हक्क बजावण्यातूनच आकाराला येणार आहे. काही मतदान एरवी तटस्थ असणाऱ्यांचे असते. काहींचे मतदान विचारपूर्वक, लोकशाही व्यवस्थेची बूज राखून केलेले असते. याचा अर्थ, हे मतदान सकारण असते.

कंठ कोणाला फुटावा?

आपले कर्तव्य पार पाडावयाचे नाही आणि सरकार, पुढारी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काहीच करीत नाहीत म्हणून गळे काढावयाचे, हा दुटप्पीपणा झाला. कर्तव्यात कसूर करावयाची आणि हक्कांच्या फायद्यासाठी मात्र पुढे राहावयाचे, असा साळसूदपणा अंगी मुरविलेले काही मुखंड असतात. स्वतःच्या घरात बसून सामाजिक कार्यकर्त्यांना-उपक्रमांना मार्गदर्शन करणाऱ्यांचा तुटवडा आपल्याकडे नाही, याचा अनुभव अनेक वेळा येतो. काय करावयाला नको, अमुक एक गोष्ट अशी-अशी व्हावयास हवी होती अशी (बाष्कळ) बडबड करणाऱ्या वाचावीरांची जमातही मोठी आहे. समाजघटकांना कधीही न भिडता ते त्यांच्या सुख-दुःखांची चर्चा करणार. त्याला माध्यमांत ठळक स्थान कसे मिळेल, याची दक्षता घेणार, त्यासाठी जीव पाखडणार. हे त्यांनी करावेही; पण त्याच्या आधी त्यांनी कर्तव्य पार पाडावे. निवडणूक-पद्धती, उमेदवार, त्यांचे चारित्र्य, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यासंबंधी बोलण्यासारखे खूप काही आहे आणि ते जरूर बोललेही पाहिजे; पण हे बोलण्यासाठी कंठ कोणाला फुटावा? …तर जे आपले विहित कर्तव्य बजावतात त्यांना.

ही कारणे नेहमीचीच!

नागरिक मतदानापासून दूर का राहिले असावेत?

सांगितली जातात, चर्चेत पुनःपुन्हा फिरत राहतात, ती कारणे नवी नाहीत, जुनीच आहेत. 1 ) आमचा लोकप्रतिनिधी पाच वर्षांत आमच्याकडे पुन्हा फिरकलाच नाही! 2 ) सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. 3 ) कोणतेच पुढारी आमच्यासाठी काही करीत नाहीत. 4 ) मतदान करून असे काय मोठे होणार आहे? नको तेच धनदांडगे, गुंड हेच पुन्हा निवडून येणार! 5 ) पुढारी फक्त आपलेच खिसे भरणार, गरिबांची-सर्वसामान्यांची त्यांना काय जाणीव आहे? 6 ) कोणीही सत्तेवर आले, तरी आमच्या रोजच्या जगण्यात-संघर्षात काय फरक पडणार आहे? 7 ) महागाई कमी करण्याच्या बाता सगळेच करतात, एकदा खुर्च्या मिळाल्या, की कोण येतो आहे आपल्या मदतीला?

कारणे समर्थनीय नाहीतच!

मतदानाविषयीची उदासीनता किंवा नकारात्मकता ज्या कारणांसाठी आहे, असे सांगितले जाते, ती समर्थनीय तर नाहीतच; उलट त्यावर उपाय शोधण्याचा मार्ग मतदानाचा आपला हक्क बजावण्यातूनच आकाराला येणार आहे. मतदानापासून दूर राहणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही, की जे मतदान होते, त्यांपैकी काही हे त्या त्या पक्षांचे किंवा उमेदवारांचे असते. काही मतदान एरवी तटस्थ असणाऱ्यांचे असते. काहींचे मतदान विचारपूर्वक, लोकशाही व्यवस्थेची बूज राखून केलेले असते. याचा अर्थ, हे मतदान सकारण असते. या मतदारांना काही ना काही घडून यावे असे वाटत असते. ते किती प्रमाणात साकार होते, सत्ताबदलासाठी किंवा सत्तेच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांची ताकद किती उपयोगी पडते हा भाग वेगळा; पण जे मतदानापासून बाजूला राहतात, ते मात्र त्यांची अशी निर्णायक शक्ती न वापरता लोकशाहीच्या बळकटीकरणालाच खीळ घालतात, हे लक्षात घेत नाहीत. हा धोका मोठा आहे आणि तो बरोबर घेऊन जे वावरतात, त्यांनी मतदान न करून आपण काय मिळविले याचा विचार करण्यापेक्षा, मतदान न केल्याने आपण काय गमावले, याचा विचार गंभीरपणाने करावयास हवा. मतदान अधिकाधिक व्हावे, यासाठी सर्वच प्रसिद्धिमाध्यमांनी मोठे जनजागरण केले. पुढाऱ्यांच्या बरोबरीनेच, सरकारी अधिकारीही मतदानासंबंधीच्या किती तरी गोष्टी लोकांपर्यंत जाऊन समजावून देत होते. मतदारांसाठीच्या प्रबोधनपर जाहिरातींचा मारा सुरू होता. आपल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी सर्व व्यावसायिकांनी त्यांना पगारी सुटी दिली.मतदार याद्यांतील चुका टाळण्यासाठी त्या मतदारांना पाहण्यासाठी खुल्या ठेवल्या गेल्या होत्या. तेव्हा त्यात आपले, कुटुंबीयांचे नाव आहे का, ते बरोबर आहे का, छायाचित्र योग्य आहे का हे तपासण्याची काळजी न घेता, आता त्यांतील दोषांवर बोलून काय होणार? दुरुस्त्या करूनही त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत, हेही खरे आहे. त्यामुळेही काहींना मतदानाचा आपला हक्क बजावता आला नाही. असे घडले असणेही शक्‍य आहे (मात्र ते समर्थनीय नाहीच); पण ही संख्या असून किती असणार? जेवढे कमी टक्के मतदान झाले, तेवढी तर निश्‍चितच नाही! चुकीच्या कृतीचे खापर फोडण्यासाठी कोणता तरी भक्कम दगड शोधावयाचा, हे आपण कधीच थांबविणार नाही का? मतदानाविषयीच्या उदासीनतेची जी कारणे वर उल्लेखिलेली आहेत, ती ठिसूळ आहेत; कारण त्यांची उत्तरे ती पुढे करणाऱ्यांच्या कृतीतच दडलेली आहेत.

तेंव्हा हे बदलण आपल्या तरुण वर्गाच्या हातातच आहे. आतातरी जागे व्हा आणी इतरांनाही जागे करा..

जय महाराष्ट्र !!!!

– ललित संखे